सीओपी26 परिषदेत सामील न होणे मोठी चूक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रोममध्ये जी20 परिषद आणि ग्लासगो येथील सीओपी हवामान परिषदेत चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन सामील न झाल्याप्रकरणी निराशा व्यक्त केली आहे. हवामान बदल अत्यंत मोठा मुद्दा असून देखील चीनने पळ काढला आहे. परिषदांना अनुपस्थित राहून चीनच्या अध्यक्षांनी मोठी चूक केल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. चीनमधील वाढती अस्थिरता आणि कोरोनाच्या भीतीने अध्यक्ष क्षी जिनपिंग मागील 22 महिन्यांपासून देशाबाहेर पडलेले नाहीत.
उर्वरित जग चीनकडे पाहत असून हवामान बदल रोखण्यासाठी चीन काय योगदान करतोय, अशी विचारणा करत आहे. चीनने जग आणि सीओपीमध्ये उपस्थित लोकांचा विश्वास गमावला असल्याचे बायडेन म्हणाले.
चीनकडून सर्वाधिक प्रदूषण
जगात कार्बन डायऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक चीनच आहे. कर्बवायू उत्सर्जनात चीनची सुमारे 28 टक्के हिस्सेदारी आहे. तरीही क्षी जिनपिंग हवामान बदलाशी संबंधित या परिषदेत सामील झालेले नाहीत. तर रशिया कर्बवायू उत्सर्जनाप्रकरणी जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
चिनी अध्यक्षांनी व्हिडिओ लिंकद्वारे सीओपी26 परिषदेला संबोधित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण आयोजकांनी त्यांना ही संधी न दिल्याने ड्रगनचा संताप झाला आहे. चीन हा सर्वाधिक प्रदूषण फैलावणारा देश असल्याने जगभरातील नेते कोंडी करू शकतात या भीतीमुळेच जिनपिंग यांनी या परिषदेपासून अंतर राखल्याचे जाणकारांचे मत आहे.









