कीव्हमध्ये घेणार झेलेंस्की यांची भेट
युक्रेनवर आक्रमण केल्याच्या दोन महिन्यांनंतरही रशियाला या देशावर कब्जा करता आलेला नाही. युद्धादरम्यान आता देशांचे प्रमुख युक्रेनला पोहोचू लागले आहेत. अमेरिकेचे संरक्षण आणि विदेशमंत्री युक्रेनचा दौरा करणार असल्याची माहिती अध्यक्ष झेलेंस्की यांनीच दिली आहे. युद्धात एकीकडे पुतीन यांचे अण्वस्त्रसंपन्न सैन्य आहे, तर दुसरीकडे छोटासा देश असलेल्या युक्रेनला पाश्चिमात्य देश सातत्याने मदत करत आहेत.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन आणि विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांची कीव्हमध्ये भेट घेणार असल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले आहे. परंतु त्यांनी अमेरिकेच्या या दोन्ही मंत्र्यांच्या दौऱयाविषयी अधिक तपशील देणे टाळले आहे. तर व्हाइट हाउसकडूनही यासंबंधी कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या गुप्त दौऱयानंतर अनेक देशांचे नेते युक्रेनच्या दौऱयावर पोहोचत आहेत.









