संरक्षण-दहशतवादासमवेत अनेक मुद्दय़ांवर चर्चा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटोनी ब्लिंकेन मंगळवारी भारत दौऱयावर येणार आहेत. ते दोन दिवसांपर्यंत म्हणजेच 27 आणि 28 जुलै रोजी भारतात असतील. अमेरिकेचे विदेशमंत्री या दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. याचबरोबर ब्लिंकेन भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यावर अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांचा हा पहिला भारत दौरा असणार आहे.
ब्लिंकेन भारत दौऱयात सुरक्षा, सायबर आणि दहशतवादविरोधी सहकार्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करतील. अमेरिकेच्या नव्या विदेश मंत्र्यांचा हा पहिला भारत दौरा असून भारत हा आशियातील अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी आहे. ब्लिंकेन सोमवारी संध्याकाळी वॉशिंग्टनमधून रवाना होतील आणि मंगळवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. ब्लिंकेन बुधवारी पंतप्रधान मोदी आणि विदेशमंत्री जयशंकर यांना भेटतील.
भारताच्या दौऱयादरम्यान सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्याचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत असेल. ब्लिंकेन आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन चालू वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांच्या 2प्लस2 मंत्रिस्तरीय चर्चेच्या आयोजनाकरता उत्सुक असल्याचे विधान अमेरिकेच्या दक्षिण आशियाविषयक विभागाचे सचिव डीन थॉम्पसन यांनी केले आहे.









