वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या राष्ट्रीय तिजोरीतून देशाच्या खर्चासाठी पैसा उचलण्यासंबंधी सत्ताधारी डेमॉव्रेटिक पक्षाचे अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि तेथील वरीष्ठ सभागृह सिनेटचे अध्यक्ष यांच्यातील मतभेद न मिटल्याने येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. येत्या 10 दिवसांमध्ये जर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नाही, तर अमेरिकेच्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणेही कठीण होणार आहे. पूर्वीही दोनदा अशी स्थिती उद्भवली आहे.
अमेरिकेचे अध्यक्षपद डेमॉव्रेटिक पक्षाच्या बायडेन यांच्याकडे आहे. तर सिनेटचे सभापतीपद रिपब्लिकन पक्षाकडे आहे. कारण तेथे या पक्षाचे बहुमत आहे. देशाच्या खर्चासाठी राष्ट्रीय तिजोरीतून उचल करण्याच्या प्रश्नावर या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बायडेन यांच्या काही आर्थिक प्रस्तावांना रिपब्लिकन पक्षाचा विरोध असल्याने त्यांच्यात एकमत होईनासे झाले आहे.
दुसरी फेरीही असफल
सोमवारी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडली. मात्र, मतभेद कायम राहिल्याने एकमत होऊ शकले नाही. परिणामी, राष्ट्रीय तिजोरीतून पैसा उचलण्याचा प्रश्न तसाच लोंबकळत पडला आहे. 2 जून पर्यंत हा तिढा सुटला नाही, तर मात्र, अमेरिकेचा अंतर्गत खर्च कसा करायचा हा प्रश्न निर्माण होईल.
ओबामांच्या काळातही…
बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असतानाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काही दिवस अमेरिकेचा अंतर्गत खर्च ठप्प झाला होता. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही दिले गेले नव्हते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पण नंतर एकमत निर्माण झाल्याने तो प्रश्न हातावेगळा करण्यात आला होता.
बायडेन यांच्यासमोर आव्हान
2024 च्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक आपण लढविणार आहोत, असे बायडेन यांनी घोषित केले असून त्यांनी तशी सज्जता करण्यासही प्रारंभ केला आहे. अशावेळी जर अमेरिकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले, तर बायडेन यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. त्याचा परिणाम, त्यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवरही होऊ शकतो. त्यामुळे ते लवकरात लवकर हा वाद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
वाद मिटण्याची शक्यता अधिक
बायडेन आणि सिनेटचे सभापती यांच्यातील वाद ताणला गेला तरी तो नंतर मिटण्याची शक्यता अधिक आहे. कारण रिपब्लिकन पक्षही आपल्या राजकारणासाठी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वेठीला धरु शकत नाही. कारण, तसा संदेश मतदारांमध्ये गेल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचीही कोंडी होऊ शकते. म्हणून एकमेकांच्या संयमाची परीक्षा पाहिल्यानंतर या दोन्ही पदांवरील नेते एकोप्याने खर्चांचे प्रस्ताव संमत करतील, अशी शक्यता अधिक आहे.
दोघांचीही संमती आवश्यक अमेरिकेच्या नियमांच्या अनुसार राष्ट्रीय खर्चाकरीता राष्ट्रीय तिजोरीतून पैसा उचलण्यासाठी देशाचे अध्यक्ष आणि सिनेटचे सभापती या दोघांचीही संमती असावी लागते. दोन्ही पदांवर भिन्न पक्षांचे नेते असल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. यावेळीही तशीच स्थिती निर्माण झाली आहे, असे दिसून येते









