ऑनलाईन टीम / यंगून :
अमेरिकेने म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन आंग लाइंग यांना चांगलाच दणका दिला आहे. लाइंग यांच्या दोन मुलांची अमेरिकेत असलेली संपत्ती तसेच यांच्या अमेरिकेतील सहा कंपन्यांचे व्यवहारही गोठविण्यात आले आहेत.
म्यानमारमधील लष्करी राजवटीने सरकारकडील सत्ता हिसकावून घेतल्यानंतर म्यानमारमध्ये शांततामय मार्गाने आंदोलन सुरु आहे. लष्करशाही विरोधात आंदोलन करणाऱ्या जमावावर अनेकदा गोळीबारही झाला. यात काहींचा जीवही गेला. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लष्करी राजवटीकडून दडपशाही होत असल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्यानमारमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून, म्यानमारवर निर्बंध लागू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांवर दबाव वाढत आहे.









