चीनी कंपन्यावरील गुंतवणूक निर्बंधांमध्ये वाढ
वृत्तसंस्था/ वाशिंग्टन
अमेरिकेच अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी चीनी कंपन्यांमध्ये होणाऱया अमेरिकन गुंतवणूकीवर आणखी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चीनच्या सेनादलांची आणि गुप्तहेर यंत्रणांची संबंधित असणाऱया कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची अमेरिकन गुंतवणूकदारांची सुविधा कमी होणार आहे. तसेच अशा कंपन्यांची संख्या ही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनच्या ज्या कंपन्या अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका ठरु शकतात अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिका आपल्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करणार नाही. अशा गुंतवणुकीचे समर्थन अमेरिका करत नाही. उलट चीनची मारक शक्ती वाढू न देण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यामुळे हे नवे निर्बंध घालण्यात आले असून निर्बंधीत कंपन्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे, असे बायडन प्रशासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
चीनकडून निषेध
अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने टिका केली असून प्रत्युत्तर देण्याची भाषा चीनने केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंधांना तडा देणारा ठरू शकतो. नवे धोरण अमेरिकेने लागू केल्यास चीनला त्याचा प्रतिवाद करावा लागेल, अशी प्रतिक्रिया चीनी अधिकाऱयांनी व्यक्त केली.
हुवाई टेक्नॉलॉजी या कंपनीवर अमेरिकेची विशेष नाराजी आहे. ही कंपनी अमेरिकेकडून तंत्रज्ञान मिळवून त्याचा छुपा वापर चीनसाठी करते, असा आरोप आहे. या शिवाय चीनी सरकारच्या मालकीच्या दुरसंचार कंपन्या आणि चीनच्या तेल कंपन्यांवरही अमेरिकेची करडी दृष्टी असल्याचे सांगण्यात आले आहे.
चीनच्या तेल कंपन्या दक्षिण चीनी समुद्रातील वादग्रस्त स्थानी तेल खोदाई करण्याच्या निमित्ताने चीनचा प्रभाव वाढवीत आहे, असा अमेरिकेचा आरोप आहे. दक्षिण चीनी समुद्रातील व्हिएतनाम, फिलीपाईन्स, ब्रुनेई आणि मलेशिया तसेच तैवान या देशांबरोबर चीनचे वितुष्ट असून अमेरिकेने या देशांच्या बाजुने आपली धोरणे ठरविली आहेत. अमेरिकेचे नवे गुंतवणूक धोरण चीनने नाकारले असले तरी या देशांना त्याचा लाभ होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.









