हल्ल्याचा बनावट व्हिडीओ ‘पीएलए’कडून जारी : तणावात भर टाकणारी चीनची नवी आगळीक
लडाख / वृत्तसंस्था
अमेरिकेबरोबरच्या सततच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या गुआम या नौदल तळावर हल्ल्याचा बनावट व्हिडीओ चीनने जारी करून आगीत तेल ओतले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाई दलाचे एच-6 हे अणुबॉम्ब वाहू शकणारे विमान वापरण्यात आल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. चिनी सैन्याने जारी केलेल्या या बनावट व्हिडीओत सदर विमान अमेरिकच्या अँडरसन हवाई तळावर बॉम्ब टाकताना दिसते.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हवाई दलाच्या वेबो अकाऊंटवर शनिवारी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. हा दोन मिनिटे आणि 15 सेकंदांचा व्हिडीओ हॉलिवूड चित्रपटाच्या टेलरसारखा दिसतो. त्यामध्ये चीनचे एच-6 बॉम्बर विमान वाळवंटातील हवाई दलाच्या तळावरून उडताना दाखविण्यात आले आहे. युद्धाची देवता एच-6 हल्ला करण्यास जात आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
चिनी हवाई दलाचा पायलट आकाशात एक बटण दाबतो आणि क्षेपणास्त्र समुद्रकिनाऱयावर बांधलेल्या अमेरिकन नौदलाच्या धावपट्टीवर आदळते. त्यारसशी उपग्रह त्याचे चित्र दाखवतो. त्यामध्ये ही धावपट्टी अमेरिकच्या गुआममधील अँडरसन नौदल तळासारखी दिसते. या व्हिडीओमध्ये चिनी हवाई दलाने विविध प्रकारचे संगीतही वापरले आहे. व्हिडीओ जारी करताना ‘आम्ही मातृभूमीचे हवाई रक्षक आहोत. मातृभूमीच्या आकाशाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता आमच्याकडे नेहमीच राहिली आहे’ असा उल्लेख कॅप्शनमध्ये लिहिल्याचे दिसून येत आहे. चीनच्या या आगळिकीने संताप व्यक्त होत आहे.
अमेरिकेकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही
सदर व्हिडीओ जारी झाल्यानंतर आतापर्यंत चीनच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा अमेरिकच्या इंडो-पॅसिफिक कमांडने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सिंगापूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रटेजिक स्टडीज येथील कोलिन कोह यांच्या मतानुसार, चीनने एका विशिष्ट हेतूने हा व्हिडीओ जारी केला असून त्यातून आपली दूरगामी क्षमता दाखविताना अमेरिकेला तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील वादांपासून दूर राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरि÷ अधिकाऱयाच्या तैवान दौऱयामुळे चीनला आलेला संताप म्हणूनही या घटनेकडे पाहिले जाते. .प्रशांत महासागरातील गुआम नौदल तळावरूनच अमेरिका चीनसह उत्तर कोरियावर काटेकोर नजर ठेवून आहे. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने व्हिडीओत दाखविलेले विमान होटान हवाई तळावर तैनात केलेले आहे.