ब्रिटन-फ्रान्स अन् जर्मनीही योजनेत सामील
वृत्तसंस्था/ टोकियो
दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती अरेरावी संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि जपानने नवी रणनीति तयार केली आहे. चिनी डाव हाणून पाडण्यासाठी अमेरिका आणि जपानने ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यासाख्या शक्तिशाली देशांना आमंत्रित केले आहे.
युरोपीय देश स्वतःच्या सामरिक रणनीतित मोठय़ा प्रमाणावर हिंद-प्रशांत क्षेत्राला प्राधान्य देत आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये ब्रिटन विमानवाहू युद्धनौका क्वीन एलिझाबेथ आणि त्याच्या स्ट्राइक ग्रूपला पूर्व आशियात तैनात करणार आहे. तर फान्स युद्धनौका तर जर्मनी फ्रिगेट पाठवत आहे.
जर्मन युद्धनौका घालणार गस्त
जर्मनीही हिंदी महासागर तसेच नजीकच्या भागांमध्ये स्वतःचे नौदल तैनात करण्याची योजना आखत आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या उत्तराधिकारी मानल्या जाणाऱया विदेशमंत्री अन्नग्रेट क्रांप यांनी जगाच्या भल्याकरता हिंद-प्रशांत क्षेत्र अत्यंत महत्त्वपूर्ण झाल्याचे तसेच जर्मनीला या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व वाढवावे लागणार असल्याचे म्हटले होते. चीनचा आर्थिक कावा तसेच भूराजनयिक रणनीतिबाबत युरोपला कळून चुकल्याचे अन्नग्रेट म्हणाल्या.









