सेन्सेक्स 788 अंकांनी तर निफ्टीत 233.60 अंकांनी घसरण
व्यापारी सत्राच्या पहिल्या दिवशी सोमवारी अमेरिका-इराण यांच्यातील तणावाचा बाजारावर प्रभाव पडला. यामुळे शेअर बाजार मोठय़ा घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 787.98 अंकांनी (1.90 टक्के) घसरत 40676.63 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 233.60 अंकांनी (1.91 टक्के) घसरून 11993.05 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून इराणला चेतावनी दिल्यानंतर तीन तासात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. दुपारी 2.30 वाजता मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचा बाजार भांडवल 154 लाख कोटी रुपये होता. तर शुक्रवारी बाजार बंद होताना हा 157 लाख कोटी रुपये इतका होता. बाजारातील पाच पैकी चार समभाग घसरणीच्या स्तरावर व्यवसाय करत होते. तर 229 समभाग विशेषतः स्मॉलपॅप आपली सर्वात खालचा स्तर गाठला होता. स्थानिक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली होती.
पश्चिम आशियातील तणाव वाढल्यामुळे स्थानिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत 3.53 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुडच्या किंमतीने 70 डॉलरचा स्तर पार केला आहे. क्रुड तेलाचा दर 2.76 टक्के तेजीसह प्रति बॅरल 70.49 डॉलरवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम होती.
सोमवारी जगभरातील बाजारात घसरणीचा प्रभाव होता. जपानच्या निक्केईमध्ये जवळपास 2 टक्क्यांची घसरण नोंद झाली. चीनचा बाजारही घसरणसह सुरू झाला. तर ऑस्ट्रेलियाच्या बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील 28 कंपन्यांचे समभाग घसरणीत होते आणि दोन कंपन्यांचे समभाग तेजीच्या स्तरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील 46 कंपन्यांच्या समभागात विक्री होती. तसेच फक्त 4 कंपन्यांच्या समभागात खरेदीची नोंद झाली.