“““`
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकटाच्या काळात जगभरातील ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन खरेदीला पसंती दर्शवल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळाले आहे. याचा फायदा थेट ई-कॉमर्स कंपन्यांना झाला असल्याचे विविध आकडेवारीतून समोर आले आहे. सध्या अमेरिकन ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉनची विक्री सप्टेंबर तिमाहीत 37 टक्क्यांनी वाढून 96.1 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे.
सदरच्या विक्रीची तुलना मागील वर्षातील समान तिमाहीत केल्यास हा आकडा जवळपास 70 अब्ज डॉलर्सच्या घरात राहिल्याची माहिती आहे. सदरचा आकडा चौथ्या तिमाहीत वाढून 112 अब्ज डॉलर ते 121 अब्ज डॉलरच्या दरम्यान राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा हा वाढून 6.3 अब्ज डॉलर्समध्ये राहिला आहे. जो मागील वर्षात समान तिमाहीत 2.1 अब्ज डॉलर्स राहिल्याची नोंद आहे. कंपनीची क्लाउड आर्म ऍमेझॉन वेब सीरीज सर्व्हिसेसची विक्रीही 29 टक्क्यांनी वाढीसह 11.6 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. तसेच ऑपरेटिंग उत्पन्न 3.54 अब्ज राहिले आहे. तसेच जाहिरात महसूलाचा आकडा 51 टक्क्यांनी वाढून 5.4 अब्जच्या घरात राहिल्याची नोंद आहे.









