वृत्तसंस्था/ चंदिगढ
‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचा आठव्या दिवशीही शोध सुरू आहे. तपास यंत्रणांना अद्याप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही. विविध तपासनाके आणि राज्य तपास यंत्रणांशी संपर्क साधूनही अमृतपालला पकडण्यात यश प्राप्त झालेले नाही. याचदरम्यान अमृतपाल सिंगचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तो पटियाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अमृतपाल जॅकेट आणि चष्मा घातलेला दिसत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सीसीटीव्ही फुटेज अमृतपाल पंजाबमधून हरियाणामध्ये येण्यापूर्वीचे आहे. येथून त्याने स्कूटी घेऊन कुऊक्षेत्रातील शहाबाद गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.









