नवी दिल्ली, अहमदाबाद / वृत्तसंस्था
देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड ‘अमूल’ने आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने विकल्या जाणाऱया दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केल्याचे जाहीर केले आहे. वाढत्या महागाईत आता दुधानेही उसळी घेतली आहे. आता ग्राहकांना 1 मार्चपासून म्हणजे मंगळवारपासून अमूलचे दूध वाढीव भावाने खरेदी करावे लागणार आहे. आता ग्राहकांना अर्धा लिटर अमूल गोल्डसाठी 30 रुपये, अमूल ताजासाठी 24 रुपये आणि अमूल शक्तीसाठी 27 रुपये मोजावे लागणार आहेत.
अमूलने अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा या सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढलेल्या किमती देशभर लागू होतील. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट वाढणार आहे. ‘अमूल’ने पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. ऊर्जा, पॅकेजिंग, वाहतूक आणि पशुखाद्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे दुधाच्या दरात वाढ केल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वाढलेल्या किमती 1 मार्च 2022 पासून लागू होतील.
वर्षात 4 टक्के दरवाढ
अमूलने वर्षभरात दुधाचे दर सरासरी चार टक्क्मयांनी वाढवले आहेत. अमूल ब्रँड चालवणाऱया गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात ही वाढ केली आहे. कंपनीने जवळपास 7 महिने 27 दिवसांनी किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दरवाढ केली होती.
खरेदी दर 40 रुपयांवर
अमूलने शेतकऱयांकडील दुधाच्या खरेदीदरात यापूर्वीच 35 वरून 40 रुपये लिटरपर्यंत वाढ केली आहे. मागील वषीच्या तुलनेत हे प्रमाण पाच टक्क्मयांनी अधिक आहे. अमूल दुधाच्या खरेदीवर देण्यात येणाऱया प्रत्येक रुपयामागे सुमारे 80 पैसे शेतकऱयांना मिळतात, असे कंपनीचे म्हणणे आहे.









