ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याचे ट्विट काही वेळापूर्वी भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केले होते. मात्र, गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळले आहे. अमित शाह यांची अद्याप दुसरी चाचणी करण्यात आली नसल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यानंतर तिवारी यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे.
तिवारी यांनी ‘देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह’, असे एका वाक्याचे ट्विट केले होते. हे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे. त्यामुळे काही काळ या वृत्तावरून संभ्रम निर्माण झाला होता.
दोन ऑगस्ट रोजी शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.









