ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी राज्यसभेमध्ये निवेदन केलं. यावेळी अमित शाह यांनी ओवैसींवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील माहिती देताना ओवैसींनी केंद्राकडून देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा तत्काळ स्वीकारावी अशी विनंती केलीय. आपलं अधिकृत निवेदन संपल्याचं जाहीर केल्यानंतर शाह यांनी अगदीच अनपेक्षितपणे ओवैसी यांना सुरक्षा स्वीकारण्याची विनंती केल्याचं चित्र पहायला मिळालं.
ओवैसी उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झाला. या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाष्य केलं.