पुणे / प्रतिनिधी :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱयावेळीच दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात दंगल कशी होते आणि याबाबत गुप्तचर विभागाला माहिती नसणे ही बाब केंद्र सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश समोर आणणारी आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला स्पष्टीकरण द्यावे व याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुळे म्हणाल्या, दिल्लीतील आंदोलनात सोमवारी एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूचा आकडा दहापर्यंत गेला. डोनाल्ड ट्रम्प आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची मंगळवारी रात्रीची भोजन भेट कशामुळे रद्द झाली, हे सांगता येणार नाही.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने त्यांना याबाबत काही माहिती दिली असेल. परंतु, मनमोहनसिंग सत्तेत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आल्यानंतर त्यांनी सर्व विरोधी पक्षांना मान-सन्मान दिला. तसा प्रकार आता दिसून येत नाही. देशात कुणी परदेशी पाहुणा आल्यानंतर त्याचे अगत्य सर्वांनी करण्याची आपली परंपरा आहे. भाजपा राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करत असल्याबाबत बोलताना भाजप विरोधकाची भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडत असून त्यांनी सातत्याने पाच वर्षे आपली भूमिका निभवावी, असा चिमटा त्यांनी काढला. आमचे दडपशाहीचे सरकार नसल्याने भाजपने पाच वर्ष आंदोलन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.









