ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांच्या मेजवानीनिमित्त एकत्र
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

राजकारणात एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जाणारे ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी एकाच टेबलाभोवती बसून भोजनाचा आस्वाद घेताना आढळल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित होते. पूर्व विभागीय राज्य मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने हा भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बैठकीच्या निमित्ताने भोजनाचे आयोजन करण्यात आले असले तरी हे भोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सन्मानार्थ आहे, असे नवीन पटनाईक यांनी स्पष्ट केले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही याचे विशेष आमंत्रण होते. त्यामुळे या भोजन सोहळय़ाला सर्वपक्षीय स्वरुप प्राप्त झाले.

चर्चेबाबतचे गूढ
या प्रीतीभोजनप्रसंगी या राजकीय नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली, याबद्दल सर्वांनीच मौन पाळले होते. त्यामुळे अनेक पत्रकारांचे कुतुहल जागृत झाले. तसेच वेगवेगळय़ा चर्चा रंगविल्या जाऊ लागल्या. अमित शहा व ममता बॅनर्जी जेवताना एकमेकांसमोरच बसले होते. त्यांच्यात कोणती चर्चा झाली असेल, यासंबंधीचे अनेक अंदाज नंतर व्यक्त करण्यात आले.
ममता बॅनर्जी सध्या अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे केंद्र सरकारशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. गेल्या कित्येक दिवसात त्यांनी पंतप्रधान मोदींवर कठोर टीका करणे टाळले आहे. तसेच सीएए व एनपीआर यासारख्या संवेदनशील विषयांवर टिप्पणी करण्यासही फाटा दिल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम बंगाल व केंद्र सरकार यांच्या संबंधांमध्ये गूढ शांतता निर्माण झालेली आढळते. ही शांततादेखील भविष्यकालीन राजकारणाचा भाग असू शकते, असा कयास राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केला.
ओरिसामध्येही बिहारप्रमाणे जात्याधारित जनगणना करण्याचा विचार असल्याचे पटनाईक यांनी स्पष्ट केले. बिहारच्या विधानसभेने नुकताच जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा प्रस्ताव संमत केला असून केंद्राकडे पाठविला आहे. यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचाच आहे.









