ऑनलाईन टीम / पणजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गोव्यात भाजपाच्या सभेत बोलताना “क्या हो गया बे” असे शब्द वापरल्याने गोव्यातील लोकांचा अनादर झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे, आणि त्यासाठी शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. “अमित शाह अशी भाषा वापरण्याचे धाडस कसे करू शकतात.” असा प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी केला आहे.कवठणकर यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी एआयसीसीचे नेते तौफिक मुल्लान आणि नटराज गौडा उपस्थित होते.
शहा यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर केलेल्या आरोपांवर आक्षेप घेत कवठणकर म्हणाले की, भाजपचे नेते पराभूत होत असल्याचे समजल्याने ते गोंधळलेले आणि निराश झाले आहेत.”शाहांनी श्री सप्तकोटेश्वर आणि तांबडीसुरला येथे महादेवाची प्रार्थना केली. त्यांनी प्रथम या खाणपट्ट्यांतील लोकांना सांगावे, की ते खाणकाम पुन्हा सुरू करण्यात का अपयशी ठरले.’’ असे कवठणकर म्हणाले.
ते म्हणाले की, भाजप प्रत्येक निवडणुकीच्या वेळी खनिजव व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देतो आणि नंतर काहीच करत नाही. “भाजपने खोटी आश्वासने देऊन भ्रष्टाचार, कोविड गैरव्यवस्थापन आणि सत्तेत राहण्यासाठी सर्व तडजोड करून गोव्याची लूट केल्याचे गोवावासीयांना समजले आहे.” असे ते म्हणाले. कवठणकर म्हणाले की, भाजपने दशकापूर्वी काँग्रेसवर ३५ हजार कोटींच्या खाण घोटाळ्याचे आरोप करून सत्ता बळकावली. “परंतु असे घडल्याचे सिद्ध करण्यात आणि पैसे वसूल करण्यात ते अयशस्वी ठरले आहे.” असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यात तळ ठोकून आहेत, ते गोव्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप हल्ला तौफिक मुल्लानं केला. ‘‘फडणवीस यांच्या अतिआत्मविश्वासाने महाराष्ट्रात भाजपला अडचणीत आणले आहे. त्याचीच पुनरावृत्ती गोव्यात होणार आहे. फडणवीस गोव्यातील जनतेला गृहीत धरत आहे. पण लोक त्यांना धडा शिकवतील.’’ असे मुल्लान म्हणाले. भाजपच्या निष्ठावंत नेत्यांना पक्षात स्थान नाही, त्यामुळे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्ष सोडून अपक्ष निवडणूक लढण्याचे ठरविले आहे असे ते म्हणाले. ज्या आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना आता त्रास होत आहे असेही ते म्हणाले.