घरोघरी जाऊन करणार भाजपला विजयी करण्याचे आवाहन, कार्यकर्त्यांचे गट तयार करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शनिवारपासून उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराणा येथे घरोघरी जाऊन ते मतदारांना भाजपला मते देण्याचे आवाहन करतील. सध्या कोरोनाच्या उदेकामुळे निवडणूक आयोगाने जाहीर सभा, रोड शो इत्यादींवर बंदी घातली आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे धोरण भाजपने अवलंबिलेले आहे.
आज शनिवारीच ते उत्तर प्रदेशातील शामली आणि बाघपत येथे पक्षकार्यकर्त्यांना भेटणार असून प्रचाराची दिशा निर्धारित करणार आहेत. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन आणि महत्वाच्या सूचना करतील. या कार्यक्रमाला पक्षाचे महत्वाचे स्थानिक नेतेही उपस्थित राहतील. त्यानंतर ते मेरठ येथे मान्यवर नागरीकांशी विचारविमर्ष करतील.
कैराणाची निवड जाणीवपूर्वक
आपल्या उत्तर प्रदेशा प्रचार अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी त्यांनी कैराणाची निवड जाणीवपूर्वक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैराणा येथून 2017 पूर्वी हजारो हिंदूना मुस्लीमांच्या दहशतीमुळे आपली राहती घरे सोडून पलायन करावे लागले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या मुद्दय़ावर भर दिला होता आणि या भागात प्रचंड यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर कैराणाची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजपचा नवा गढ
पश्चिम उत्तर प्रदेश हा गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपचा गढ बनला आहे. जाटांची संख्या या भागात लक्षणीय आहे. पूर्वी हा भाग भारतीय लोकदलाचा गढ मानला जात होता. त्यानंतर तो राष्ट्रीय लोकदलाचे बलस्थान होता. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये येथे सामाजिक स्थिती बदलली आहे. तथापि, या निवडणुकीत सपने रालोदशी युती केल्याने भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने या भागात विधानसभेच्या जागांचे शतक गाठले होते.
प्रथम दोन टप्प्यात मतदान
पश्चिम उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. भाजपसाठी हे टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच सप आणि रालोद यांनाही आपला प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी याच भागात मोठी मजल मारावी लागणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या भागात या दोन्ही पक्षांचा त्यांची आणि काँगेसची युती असूनही धुव्वा उडाला होता.









