ऑनलाईन टीम / अमरावती :
त्रिपुरातील अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस केल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अनेक शहरात उमटत आहेत. भाजपाने आज बंदचे आवाहन केले होते. मात्र, या बंदला हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
ठाकूर म्हणाल्या, अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. मात्र, परिस्थिती पुन्हा चिघळू नये यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी शांतता व संयम पाळावा.
परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊ, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केलं आहे.