ऑनलाईन टीम / अमरावती :
अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (वय 30 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावलं आणि तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.
ही बाब तरुणीने वरिष्ठ महिला सहकाऱ्याला कळवली. त्या दोघींनी महिला टेक्निशिअन नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्पेश देशमुखने महिला टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. तसेच तपासणीसाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असेही म्हटले. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले. इतकंच नाहीतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचंही सांगितलं.
योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीला शंका आली आणि तिने ही बाब भावाला सांगितली. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे कोरोनाची चाचणी करत नसल्याचं सांगितलं. यानंतर तरुणीच्या तक्रारीवरुन अल्पेश देशमुख याच्याविरोधात बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्ह्याची नोंद केली.









