प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव शहरातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण शहर व उपनगरात खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना थोपविण्यासाठी काही कडक निर्बंध लादावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी थोडी गैरसोय झाली तरी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी शुक्रवारी रात्री केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगाव येथील आणखी 5 जणांचा सहभाग असल्याचे उघड होताच, हे रुग्ण नेमके कुठले? कोणाच्या संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली? त्यांच्या संपर्कातील आणखी किती जण आहेत? त्यांची अवस्था काय आहे? आदीविषयी प्रश्नांची मालिकाच उभी ठाकली.
जिल्हा प्रशासनाने त्यांची ठिकाणे लवकर जाहीर केली नाहीत. सुरुवातीला हे सर्व पाचही जण एका कॅम्प परिसरातील असल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात पाचपैकी तिघे जण कॅम्प परिसरातील आहेत. तर एकटा अमननगर परिसरातील आहे व आणखी एकटा बॉक्साईट रोडवरील आत्मा कॉलनी परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हाधिकाऱयांनी 3 एप्रिल रोजी रात्री कॅम्प परिसराला निर्बंधित क्षेत्र घोषित केले आहे. आता अमननगर व आत्मा कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर अचानक पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांच्या हालचाली वाढल्या. निजामुद्दीन मरकजहून परतल्यानंतर एक तरुण आत्मा कॉलनी येथील आपल्या भावाच्या घरी वास्तव्य करून होता. आता त्याच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येत आहे.
कॅम्प परिसरात राहणाऱया एका तरुणाने अमननगर परिसरात घर घेऊन सध्या आपले बिऱहाड हलविले आहे. त्याचे वास्तव्य या परिसरात असले तरी वावर मात्र कॅम्प परिसरातच असतो. त्यामुळे अमननगर परिसरातील त्याच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर बॉक्साईट रोडवरील आत्मा कॉलनी व अमननगर परिसरालाही प्रतिबंधित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची शक्मयता आहे.









