शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
दीड वर्षांनंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अभ्यासक्रम कपात करण्याचा सध्या विचार नाही. याबाबत डिसेंबरमध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. शिमोगा जिल्हय़ातील मलवगोप्प येथील उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रारंभोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
पदवीपूर्व कॉलेज लवकर सुरू झाल्याने अभ्यासक्रमात कपात केली जाणार नाही. या कॉलेजला केवळ महिना विलंब झाला आहे. नुकताच दसरा सुटीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे आणखी सुटय़ांच्या बाबतीत तडजोड करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे, असे ते म्हणाले.
प्राथमिक शालेय शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तीन फेऱयांमध्ये चर्चा झाली आहे. बढतीच्या बाबतीत सरकार आणि शिक्षक संघटनेमध्ये समझोता शक्य झालेला नाही. परीक्षा घेऊन प्राथमिक शालेय शिक्षकांना माध्यमिक विभागासाठी बढती देण्यास सरकार तयार आहे, असेही शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले. पुढील आठवडय़ापासून पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी देखील पूर्ण दिवस शाळा भरवून मध्यान्ह आहार योजनेंतर्गत दुपारचे जेवण दिले जाईन, असेही ते म्हणाले.
शाळा दुरुस्तीसाठी दत्तक योजना
राज्यात 48 हजार शाळा आहेत. त्यापैकी 28,900 शाळांच्या इमारती अत्यंत सुस्थितीत आहेत. 7 हजार शाळांची दुरुस्तीकामे हाती घ्यावी लागणार आहेत. अशा शाळांमध्ये दोन टप्प्यामध्ये वर्ग भरविण्याची सूचना देण्यात आली आहे. मुलांची पटसंख्या घटलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासंदर्भात अद्याप स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळांच्या विकासासाठी दत्तक योजना जारी करण्यात आहे. त्याकरिता ‘माझी शाळा माझी देणगी’ ऍप तयार करण्यात आले आहे. सध्या अर्धा दिवस शाळा भरविण्याची सूचना देण्यात आली आहे.









