वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या उपसरचिटणीसपदी भारताचा माजी फुटबॉलपटू अभिषेक यादवची नियुक्ती करण्यात आली आहे. फुटबॉल फेडरेशनमध्ये पहिल्यांदाच उपसरचिटणीसपद नव्याने स्थापन करण्यात आले आहे.
भारताचा माजी फुटबॉलपटू 40 वर्षीय अभिषेक यादवने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, सुनील छेत्री, महेश गवळी आणि क्लायमॅक्स लॉरेन्स यांच्यासमवेत अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2018 च्या जानेवारीमध्ये अभिषेक यादवची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यादवने ही जबाबदारी चोखपणे पार पाडत भारतीय संघाचा दर्जा सुधारल्याचे आढळून आले आहे. 2017 साली भारतात झालेल्या फिफाच्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघ तसेच इंडियन ऍरोज संघाच्या विकासामध्ये अभिषेक यादवचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. भारतीय यादवने दीर्घ काळ यशस्वी फुटबॉल कारकीर्द घडविली आहे. अभिषेक यादवने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत महिंद्रा युनायटेड, मुंबई एफसी आणि चर्चिल ब्रदर्स संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. कतारमध्ये 2011 साली झालेल्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये अभिषेक यादवचा समावेश होता.









