ममतांच्या भाच्यावर अनेक आरोप – पत्नीविरोधातही गुन्हे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अलिकडची विधाने पाहिल्यास त्या दडपणाखाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तृणमूल काँग्रेस विधानसभा निवडणुकीत कमकुवत ठरल्यास त्याचे मुख्य कारण ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर झालेले विविध आरोप असतील असे राजकीय विश्लेषकांचे मानणे आहे. अभिषेक बॅनर्जी सातत्याने विविध मुद्दय़ांवर घेरले जात आहेत.
अभिषेकचा वाढता हस्तक्षेप
बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. पक्ष सोडून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच पक्षात आता अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा हस्तक्षेप वाढू लागल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी आता स्वतःचे सत्तापद अभिषेक बॅनर्जी यांना हस्तांतरित करू पाहत असल्याचेही बोलले गेले आहे. यातूनच अनेक नेत्यांमधील नाराजी वाढली आहे.
अभिषेकच्या पत्नीवर आरोप
अभिषेक यांच्या पत्नीचे नाव रुजिला नरुला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी 15 मार्च रोजी रुजिराला कोलकाता विमानतळावर दोन किलो सोन्यासह पकडण्यात आले होते. बँकॉककमधून सोन्याची तस्करी केल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. कस्टम अधिकाऱयांनी विमानतळावर रोखले असता तिने धमकाविल्याचाही आरोप झाला होता. कस्टम विभागाने रुजिराच्या विरोधात समन्स बजावला होता. समन्स फेटाळण्यासाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्याविरोधात सध्या सोने तस्करीप्रकरणी खटला सुरू आहे. अभिषेक यांनी यादरम्यान रुजिरा यांचा बचाव केल्याने त्यांना टीकेला तोंड द्यावे लागले होते.









