गोवा फॉरवर्ड युवा शाखेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
केवळ जिल्हा पंचायत निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन कोरोनाग्रस्तांची संख्या कमी दाखवणारे सरकार सपशेल उघडे पडले असून कुजिरा संकूल, उसगाव आणि केपे येथील विद्यालयांतून विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाग्रस्त सापडल्यावरून हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा शाखेने केली आहे. या पार्श्वभूमिवर आता अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यासंबंधी गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन सादर करून ही परीक्षासुद्धा ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी केली आहे.
फॉरवर्डच्या युवा शाखेचे उपाध्यक्ष रुणाल केरकर यांनी बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. त्यावेळी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक सचिव शांतन कुवेलकर आणि यश व्होडकर उपस्थित होते.
राज्यात कोरोनाग्रस्त वाढण्याची दुसरी लाट येण्याची शक्यता थेट गोमेकॉच्या डीननीच व्यक्त केलेली असताना सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. दहावी, बारावीचे वर्ग चालू करून सरकारने विद्यार्थ्यांप्रती आपली असंवेदनशीलता उघड केली आहे. परिणामी राज्यात अनेक विद्यालये व उच्च मा. विद्यालयांमधून आता शिक्षक आणि विद्यार्थीही कोरोनाग्रस्त सापडू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीती पसरलेली आहे. तरीही त्यातून बोध न घेता सरकारने आता अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षा थेट महाविद्यालयातच घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अशा काही महाविद्यालयांमधून शिक्षण घेणाऱया अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र त्यांना 14 दिवसांचे होम कोरंटाईन किंवा तपासणी न करताच थेट परीक्षेला बसण्यास मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यातील एखादा विद्यार्थी कोरोनाग्रस्त असल्यास अन्य विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
’स्वेच्छेने परीक्षेस बसत असल्याचे’ हमीपत्र
यावर कहर म्हणजे परीक्षेला बसण्याची सक्ती जरी सरकारकडून करण्यात येत असली तरी कोणत्याही विद्यार्थ्याची जबाबदारी सरकार घेणार नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ’स्वेच्छेने परीक्षेस बसत असल्याचे’ हमीपत्र द्यावे लागणार आहे. हा एकूण प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय असून त्यामुळेच या परीक्षा घेण्यास फॉरवर्डने जोरदार आक्षेप घेतला आहे.
सरकारने या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आपला निर्णय बदलावा व वर्षभरात ज्याप्रकारे ऑनलाईन शिकवणी व परीक्षा घेण्यात आल्या त्याच धर्तीवर ही परीक्षाही ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खास करून आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोवा विद्यापीठाला निवेदन सादर
दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी प्रतिनिधींनी गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर परीक्षा ऑफलाईन घेण्यास जोरदार विरोध दर्शवला. परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे एकुणच हित लक्षात घेऊन या परीक्षा एकतर रद्द कराव्या किंवा ऑनलाईन घ्याव्या अशी विनंती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये : कामत
या मागणीवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन नियंत्रकांनी दिल्याचे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दुर्गादास कामत यांनी सांगितले. परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र स्वतःच्या फायद्यासाठी सरकाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी मागणी केली. जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे भासविण्यात येत आहे. मात्र हे मुख्यमंत्र्यांचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपची युवा संघटना गप्प का?
हाच प्रकार भाजप विरोधात असताना घडला असता तर भाजपची युवा संघटना एव्हाना रस्त्यावर उतरली असती, प्रसंगी त्यांनी कायदाही हातात घेतला असता. परंतु सध्या ही संघटना अस्तित्वच हरवून बसली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि एकुणच भवितव्याचा प्रश्न उपस्थित झालेला असतानाही त्यांचा एकही प्रतिनिधी आवाज सुद्धा काढत नाही हा प्रकारच आश्चर्यचकित करणार आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
‘एनएसयूआय’चे शिक्षण खात्याला निवेदन
नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) गोवा शाखेने शिक्षण खात्याला निवेदन सादर करून शाळेतील सुरू करण्यात आलेले वर्ग त्वरित बंद करावेत, अशी मागणी केली आहे. शाळेत कोरोना रूग्ण सापडल्याने वर्ग व परीक्षा प्रत्यक्षात घेणे धोकादायक असून त्या घेऊ नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी एनएसयूआयचे शिष्टमंडळ पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या मुख्य कार्यालयात गेले, तेव्हा संचालकांनी भेट देण्यास नकार दिल्याने त्यांनी तेथे निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाईन वर्ग, परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केल्याची माहिती अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी दिली.









