राजापूरातील इमारत धारकांसमोर प्रश्न, सात दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे न.प.चे आदेश
वार्ताहर/ राजापूर
राजापूर नगर परिषद प्रशासनाने शहरातील 37 बहुमजलीय इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटीसा बजावल्या असून सात दिवसांच्या आता ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र राजापूरात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंता नसताना ऑडिट कसे करायचे असा प्रश्न इमारत धारकांसमोर आहे.
महाड येथील दुर्घटनेनंतर सर्व इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मोहिम राबविण्यात येत आहे. तशा कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबधित यंत्रणांना दिल्या आहेत. त्यानुसार राजापूर नगर परिषदेने शहरातील 37 इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटीसा बजावल्या आहेत. परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याकडून संबधित इमारतींचे मालक किंवा भोगवटदार यांनी आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याचा अहवाल या कार्यालयाकडे हे पत्र मिळाल्यापासून सात दिवसात सादर करणेत यावा असे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 193 अ व 195 मधील नियमांनुसार उचीत कार्यवाही केली जाईल असा इशारा दिला आहे.
या नोटींसांमुळे सदनिकाधारक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण राजापूरात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी परवानाधारक स्ट्रक्चरल अभियंताच नाही. त्यामुळे रत्नागिरीतील अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागणार आहे. मात्र कोरोना संकटात तात्काळ अभियंता उपलब्ध होतानाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सात दिवसात कसे काय स्ट्रक्चरल ऑडीट करणार असा यक्षप्रश्न इमारत धारकांपुढे निर्माण झाला आहे. शहरातील काही इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन तीन ते चार वर्षे झालेले असतानाही अशा इमारत धारकांनाही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे अशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









