प्रतिनिधी / सावंतवाडी:
शहरातील सालईवाडा येथील सुदेश अजित महाडिक (30) या तरुणाने गुरुवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. कुत्र्याला बांधायच्या बेल्टने घराच्या खिडकीला त्याने गळफास घेतला. सुदेश हा मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो सध्या घरीच होता. जावा मोटारसायकल मॉडीफाय करून नवीन मॉडेल बनविण्याचा त्याचा
प्रयत्न होता. मात्र, त्याने अचानक आत्महत्या केल्याने त्याच्या मित्रपरिवाराला धक्का बसला. सुदेश हा सुखवस्तू कुटुंबातील होता. त्याचे वडील जिल्हा बँकेतून, तर आई कामगार कल्याण केंद्रातून सेवानिवृत्त झाली होती.
घटनास्थळी हवालदार बाबू तेली, नवनाथ शिंदे यांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुदेश याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली नव्हती. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.









