मनोहर सप्रे/ देवरुख
जन्मतः ज्याच्या हातात कला प्राप्त झालेली असते ती, त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. कला ही केवळ शिकून साध्य करण्याची विद्या नाही. यासाठी मूळातच हातात कला असावी लागते आणि बोटं तशी वळावी लागतात. एखाद्याच्या हाती बालपणापासून असलेली कला, भविष्यात त्याने भिन्न पध्दतीचे शिक्षण घेतले तरी मोठेपणी त्याला स्वस्थ बसू देत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्याच्या देवरुख अभियंता असलेले अभिजीत गानू. मुंबईच्या नोकरीत मन रमले नाही म्हणून हा अवलिया कलाकार गावी परतला आणि त्याने बांबू पासून विविध आकर्षक आकार तयार करण्याची आपली कला जोपासणे सुरु केलेय. यातून छंदा बरोबरच बांबूच्या वस्तूंमधून अर्थार्जनही होवू लागलेय. कोकणच्या बांबूला अभिजात दर्जा देणाऱया अभिजीत या कलाकाराचे विविध कलाकारांनी कौतूक केले.
अभिजीत गानू यांचे मूळ गांव संगमेश्वर तालुक्यातील देवरुख बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. शाळेतील चित्रकला वहितील उत्तमोत्तम चित्र पाहून कलाशिक्षक अभिजीतवर खूष असायचे. कलेची आवस असली तरी, कलामहाविद्यालयात जावून शिक्षण घेणे अभिजीत यांना शक्य झाले नाही. हुषार विद्यार्थी म्हणून ओळख असल्याने अभिजीत अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळला आणि त्यातच पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबईत नोकरीलाही लागला . नोकरीत काही वर्षे चांगली गेली. पण हातात कला दडलेली असल्याने ती अंतर्मनापर्यंत पोहचून अभिजीतला सतत अस्वस्थ करत असे. अखेरीस नोकरी सोडून देवरुख या गावी येवून स्थिरावण्याचा निर्णय अभिजीतनी घेतला.
शाळेत असतांना काष्ठ शिल्प या प्रकाराचे अभिजीतला मोठे आकर्षण होते. टाकाऊ लाकडात विविध आकार शोधण्यात त्याचा तासंतास वेळ जायचा. नोकरी सोडून गावी आल्यानंतर कला क्षेत्रातच काहीतरी वेगळं करायचे म्हणून अभिजीत यांनी बांबू मध्ये काही कलाकुसरीच्या वस्तू तयार करता येतील का, यावर अभ्यास सुरु केला . याबाबत त्यांनी तज्ञ आणि जून्या जाणत्या लोकांकडून बांबूची वैशिष्टय़े समजून घेतली. कोकणात बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र याचा उपयोग बांबू तोडून तो मुंबईकडे विक्रीसाठी पाठविण्याव्यतिरिक्त फारसा होत नाही’ माणा’ जातीच्या बांबू पासून परडय़ा, हारे, सुपं, रोवळ्या कोकणात मोठय़ा प्रमाणावर बनवल्या जातात. याच बांबू पासून जर शोभिवंत वस्तू तयार केल्या तर कलेतील आवड जोपासली जाईल आणि अर्थार्जनही होइल. म्हणून अभिजीत यांनी बांबू पासून घडय़ाळाचा पेन स्टॅंड, दिव्याची शेड, चेंडूचे तोरण, आकाशकंदील तोरण आदि वस्तू बनवायला सुरुवात केली. यात रात्रीच्या वेळी रंगीत दिवा लावल्यानंतर या सर्व वस्तू अपेक्षेपेक्षा अधिक आकर्षक दिसू लागल्या आणि या वस्तूंना ग्राहकांची मागणी देखील येवू लागली.
अभिजीत गानू यांनी बांबूच्या या पर्यावरण पूरक शोभिवंत वस्तू मोठय़ा प्रमाणावर तयार करायला सुरुवात केली असून वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी, वास्तूशांती आदि प्रसंगी या वस्तू भेट देण्यास उपयुक्त असल्याने बांबूच्या या वस्तूंना असणारी मागणीही वाढू लागल्याचे अभिजीत यांनी’ सामना’ जवळ बोलतांना सांगितले. दरम्यान कोकणच्या बांबूला अभिजात दर्जा मिळवून देण्याचा आपला यातून नक्की प्रयत्न राहील असे अभिजीत यांनी अभिमानाने सांगितले. पर्यावरण पूरक असणाऱया या बांबूच्या वस्तू नक्कीच आकर्षक, सुंदर आणि कलाकाराचे कौशल्य दाखविणाऱया असल्याचे बुरंबी येथील काष्ठ शिल्पकार दिलीप म्हैसकर यांनी नमूद केले.









