शाळेत असताना विनोबांची एक गोष्ट वाचली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात उन्हाळय़ाचे दिवस असताना विनोबा ब्रिटीश वाचनालयात वाचायला जात. कधी कधी वीज नसे. तेव्हा उकाडा असह्य झाल्यामुळे वाचायला बसताना विनोबा सदरा काढून बसत. (त्या वेळी वाचनालयात महिला वाचक नसत.) पण एकदा इंग्रज ग्रंथपालाने त्यांना हटकले आणि म्हणाला, “वाचनालयात असे बसणे हे सभ्यतेला धरून नाही.’’ त्यावर विनोबा तात्काळ उत्तरले, “कोणताही नैतिक-कायदेशीर अधिकार नसताना तुम्ही येऊन आमच्यावर राज्य करणे हे तरी सभ्यतेला धरून कोठे आहे?’’ पुढे काय झाले हे गोष्टीत दिले नव्हते. पण इतकी वर्षे झाली तरी गोष्ट लक्षात राहिली आहे.
विनोबांनी दाखवला तो अभिमान होता. बाणेदारपणा होता. सांप्रती नोकरशहा आणि नेते लोक दाखवतात तो बऱयाचदा माज असतो. उत्तर प्रदेशातली एक बातमी आहे. एका गावात जनता कर्फ्यूची आणि कोरोनासंबंधात सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी पोलीस अधिकारी गस्त घालीत होते. अचानक एक सद्गृहस्थ मास्क आणि हेल्मेट न लावता येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले. सद्गृहस्थांनी गुर्मीत सांगितले की आपण वीज बोर्डात काम करतो. पोलीस त्यांना सोडेनात. सद्गृहस्थ म्हणाले, तुम्हाला माझी पॉवर दाखवतो. त्यांनी खिशातून मोबाईल काढून झटकन एक मेसेज केला आणि क्षणार्धात त्या भागातली बत्ती गुल झाली. तरीही पोलीस डगमगले नाहीत. त्यांनी शांतपणे सद्गृहस्थांच्या कचेरीत संपर्क साधला. आता सद्गृहस्थ निलंबित झाले असून त्याच्यावर कारवाई चालू आहे. ती पूर्णत्वाला जाईल अशी आशा करू या. पुण्याजवळचा एक किस्सा सांगतो. एका घरात विषारी नाग निघाला. कुटुंबातल्या लोकांनी सर्पमित्राला फोन करून बोलावले. दरम्यान त्या वॉर्ड ऊर्फ प्रभागातल्या एका स्थानिक नेत्याला ही गोष्ट समजली. नेत्याची नुकतीच हायकमांडने उपाध्यक्षपदी निवड केली होती. त्यामुळे आणि सोमरसाच्या प्रभावामुळे नेता ‘सातव्या आकाशात’ होता. तो तत्काळ त्या घरात शिरला. नागोबासमोर बसला. त्याने नागोबाला शिव्या दिल्या. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करताना तो आवेशात बोलत होता, “मला तू ओळखलं नाहीस. मी अमुक अमुकचा उपाध्यक्ष आहे. तुला माझं कार्ड दाखवू का?’’ आणि त्याने नागोबासमोर नेमणूकपत्र आणि कार्ड धरले. नागोबाने तत्काळ त्याच्या मनगटावर दंश केला आणि नेता दिवसभरात यमलोकी पोचला. या किश्शात किंचितही अतिशयोक्ती नाही!








