ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी निकिता कौल धौंडियाल या शनिवारी भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदावर दाखल झाल्या आहेत. लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी चेन्नईत निकिता कौल यांच्या खांद्यावर स्टार चढवले.

2019 साली पुलवामात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आज त्यांची पत्नी निकिता कौल यांना सेनेची गणवेशत परिधान करत आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली अर्पण केली. हा त्यांच्यासाठी निश्चितच एक अभिमानाचा क्षण आहे, लष्कर कमांडर लेफ्टनंट वाय के जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर स्टार चढवले, असे ट्विट करण्यात आले आहे.
तामिळनाडूच्या चेन्नई अधिकारी ट्रेनिंग अकादमीत आज पासिंग आऊट परेड पार पडली. लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण केले.
शहीद मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या मृत्यूपूर्वी केवळ दहा महिने अगोदर विभूती आणि निकिता यांचा विवाह पार पडला होता. निकिता कौल धौंडियाल आज लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.









