द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ दुर्घटना
लोणावळा / वार्ताहर
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्मयाजवळ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्या व त्यांचा चालक जखमी झाला आहे. शनिवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शबाना आझमी या त्यांची टाटा स्ट्रिम गाडी क्र. (एमएच 02 सी झेड 5385) मधून पुण्याच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्मयाजवळ त्यांची गाडी समोरील ट्रकला (क्र. एमएच 09, सीयू 8010) मागून धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये गाडीच्या मागील सिटवर बसलेल्या शबाना आझमी यांच्या डोळय़ाला, नाकाला व तोंडाला मार लागला असून, त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीच्या स्टेअरिंगची एअर बँग उघडल्याने चालक बचावला आहे. अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. शबाना आझमी यांच्या कारच्या मागेच दुसऱया गाडीत असलेले जावेद अख्तर हेसुद्धा तात्काळ घटनास्थळावर दाखल झाल्याने जखमी दोघांना तातडीने उपचाराकरिता रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, महामार्गचे एस. एस. पुजारी यांनी घटनास्थळावर येऊन अपघाताची पाहणी केली.









