ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे आज पहाटे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रवीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे.
‘तुम्ही नेहमी माझ्याबरोबर चालत रहाल, मी नेहमीच तुमची असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा,’ असे कॅप्शन देत रवीनाने तिच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे.
लव्ह इन शिमला’ आणि ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटांमधून चित्रपट दिग्दर्शनातील बारकावे शिकल्यानंतर रवी यांनी दिग्दर्शक म्हणून ‘अनहोनी’ हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत ‘खेल खेल में’ हा चित्रपट बनवला, त्याचा रिमेक म्हणून अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ चित्रपट बनवण्यात आला होता. ‘मजबूर’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’,‘चोर हो तो ऐसा’ यासारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. 1960 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.