ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
कंगनाला याआधी जेव्हा समन्स पाठवण्यात आले होते. तेव्हा तिने आपल्या भावाचे लग्न असल्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले होते. तक्रारदार महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी गेल्या महिन्यात मुंबई वांद्रे कोर्टात रंगोली आणि कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.









