ऑनलाईन टीम / चंदीगड :
कंगना रानौत पुन्हा एकदा नवीन वादात अडकली आहे. शेतकरी आंदोलनात सामील वृद्ध महिलेला दिल्लीच्या शाहीन बागेतील आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षांच्या बिलकीस बानो समजून, सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना रानौत त्यांच्यावर टीका केली होती.

या टीकेनंतर आता कंगनाने माफी मागावी, अशी मागणी सुरू आहे. तर, पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टातील चंडीगड स्थित जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सामील झाले आहेत. या आंदोलनात सामील झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकीस बानो समजून कंगनाने तिच्यावर टीका केली होती. तर, तिची टीका पाहून नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
आंदोलन करणारी महिला ही बिलकीस बानो नसून, दुसरीच कोणीतरी आहे, हे लक्षात आल्यावर कंगनाने तिचे ट्विट डिलीटदेखील केले. परंतु, आता तिने या आजीची 7 दिवसांत माफी मागावी, अशी कायदेशीर नोटीस तिला पाठवण्यात आली आहे.









