प्रतिनिधी/ पणजी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसी लागू केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानसभेतील अभिनंदन ठरावास विरोधकांनी विरोध करुन ते सर्वजण सभापती राजेश पाटणेकर यांच्या आसनासमोर गेल्यामुळे सभागृहात गोंधळ माजला.
याच विषयावर अर्धातास चर्चेची मागणी करणारा ठराव दिलेला असताना तो डावलून अभिनंदनाचा ठराव कसा काय घेतला? अशी विचारणा विरोधकांनी करुन सभापतींना जाब विचारला तसेच त्यांच्यावर टीकाही केली. तेव्हा कामकाज चालवणे अशक्य झाल्याने शेवटी सभापतींनी विधानसभा दुपारी 2.30 वा.पर्यंत तहकूब केली.
मोन्सेरात मांडत होते अभिनंदनाचा ठराव
सकाळच्या सत्रातील कामकाज संपताना शून्य तासानंतर आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मोदी – शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यास सुरुवात केली. तेव्हा आमदार विजय सरदेसाई यांनी सर्वप्रथम त्यास आक्षेप घेतला. विरोधकांचा त्याच विषयावर अर्धातास चर्चेचा ठराव असताना अभिनंदन ठराव मांडू देणे चुकीचे असून हा लोकशाहीचा खून आहे. सत्ताधारी पक्षाच्या दडपणाखाली येऊन काम करु नका, असे आवाहन सरदेसाई यांनी सभापतींना केले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, मगोचे सुदिन ढवळीकर तसेच अपक्ष आमदार रोहन खंवटे तसेच काँग्रेसच्या इतर आमदारांनी सरदेसाईंना साथ दिली. विरोधकांच्या चर्चेचा ठरावही आताच घ्या, अशी मागणी विरोधकांनी केली परंतु ती सभापतींनी फेटाळली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करुन अभिनंदन ठरावास आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यास कोणी अडवू नये असे सांगून ठराव मांडण्याची सूचना मोन्सेरातना केली. त्यावेळी विरोधकांचा आक्षेप चालूच होता. सभापतीनीही मोन्सेरातना ठराव मांडण्यास सांगितले व ते गोंधळातच ठराव मांडू लागले. तेव्हा सर्व विरोधक आमदारांनी आसने सोडून सभापतीसमोर गेले आणि त्यांना जाब विचारु लागले. सभापतींनी त्यांना बोलण्याची संधी देतो म्हणून सांगून पाहिले परंतु विरोधकांनी ऐकले नाही. तेव्हा गोंधळ वाढतच गेला. शेवटी सभापतींनी कामकाजच तहकूब केले. एवढे झाले तरी मोन्सेरात अभिनंदन ठराव वाचतच राहिले आणि सभागृह तहकूब झाल्याचे समजताच खाली बसले.









