शेतमजुराचा वेश करून पोलिसांनी झेंडेसह साथीदारांना पकडले
प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन रतन झेंडे याने एकावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी घडली. झेंडेच्या हल्ल्यात सागर करडे हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कराड ग्रामिण पोलिसांनी अभिनंदन झेंडे व अन्य दोघेजण (नावे समजू शकली नाहीत) अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. किल्लेमच्छिंद्रगड परिसरात लपलेल्या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांना शेतमजुराचा वेश करून सापळा रचावा लागल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन झेंडे याच्यावर कराड पोलिसात वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. शुक्रवारी रात्री अभिनंदन झेंडे व रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर करडे हे जुळेवाडी येथे एकत्र बसले होते. बोलत असताना अभिनंदन झेंडे व सागर करडे याच्यांत काही कारणावरून खटका उडाला. त्यावेळी सागर करडे याने अभिनंदन झेंडे याला मारहाण केली. मारहाण केल्याचा राग मनात धरून शनिवारी सकाळी अभिनंदन झेंडे त्याच्या साथीदारासह तलवारी सारखे हत्यारे घेऊन जुळेवाडी येथे जावून सागर करडे याच्या डोक्यात तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी करून पलायन केले होते.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व त्यांचे कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करीत आहेत. जुळेवाडी येथे सागर करडे याच्यावर वार करून अभिनंदन झेंडे व त्याचे साथीदार किल्ले मच्छिंद्रगडच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात जावून लपून बसले होते. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी शेतमजूराचा वेश परिधान करून जंगलात शोधमोहिम राबवत असताना आपल्या कर्मचाऱयासह सापळा रचून अभिनंदन झेंडेसह दोघांना ताब्यात घेतले









