अभाविप राज्याध्यक्ष वीरेश बाळीकाई यांचे प्रतिपादन; राज्य कार्यकारिणी परिषदेला प्रारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही संघटना विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सर्व कार्यक्रम बंद होते. या काळातही अभाविपने विद्यार्थ्यांसाठी आंदोलने सुरूच ठेवली. पुढील काळात महिला, विद्यार्थी, नवीन शैक्षणिक धोरण अशा विविध विषयांवर अभाविप काम करणार असल्याची माहिती अभाविपचे राज्याध्यक्ष वीरेश बाळीकाई यांनी दिली.
अभाविपच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवशीय परिषद केएलई शताब्दी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्य सचिव प्रतीक माळी, राष्ट्रीय सेपेटरी हर्ष नायर, दक्षिण-मध्य प्रमुख स्वामी मरलापूर, राज्य संघटक मंजुनाथ व ऐश्वर्या शेट्टी उपस्थित होते.
प्रतीक माळी म्हणाले, कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कोरोना असताना राज्य सरकार नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु यामध्ये अनेक त्रुटी आहेत. यावषी निकालात वाढ झाल्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली. परंतु त्याप्रमाणात वर्ग व शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरीच आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची फी वाढ केल्याने विद्यार्थी भरडले जात आहेत. याचा सरकारने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
या दोन दिवशीय परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून अभाविपचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.









