वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघच्या (जेएनयूएसयू) सदस्यांदरम्यान जेएनयू परिसरात एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून वाद झाला. अभाविप आणि जेएनयूएसयूने रविवारी रात्री परस्परांच्या सदस्यांवर हल्ला करणे आणि अन्य विद्यार्थ्यांना जखमी करण्याचा आरोप केला असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. सध्या याप्रकरणी आतापर्यंत कुठलाच गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमासाठी छात्रसंघ सभागृहाचे बुकिंग केले होते. पण आयोजक रविवारी संध्याकाळी उशिरा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सभागृहात पोहोचले असता अभाविपच्या 15 सदस्यांनी तेथे कब्जा केला असल्याचे आढळून आल्याचा दावा डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक आणि जेएनयूएसयूची एक शाखा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आइसा) सदस्यांची सभागृहात अभाविपच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली आहे.
डाव्यांशी संबंधित संघटनेच्या सदस्यांनी टेफ्लासमध्ये एका बैठकीचे आयोजन केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप अभाविपने केला आहे. घोषणाबाजीची माहिती कळताच कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही गट परस्परांवर बैठकीत अडथळा आणल्याचा आरोप करत आहेत. तपास सुरू असून त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त गौरव शर्मा यांनी सांगितले आहे.









