वार्ताहर / कास :
घनदाट जंगलातील निरव शांततेत जीवनमान जगणारे वन्य प्राणी तसे पाहिले तर भित्रेच. मात्र, अलिकडे हेच वन्य प्राणी निर्ढावलेल्या स्थितीत गावांसह शहरांकडे वाटचाल करू लागले आहेत. त्यामुळे अनेक वेळा माणुस अणि वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष होऊ लागला आहे. यामध्ये डोंगरकपारीतल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. एवढे हातघाईवर वन्यप्राणी का आले असून ते निसर्ग सोडून सिमेंटच्या जंगलात घुसू लागले आहेत.
नक्की माणसांच जंगलावर आतिक्रमण झालेय की वनविभाग सुस्त होऊन खुर्चीत बसल्याने वन्यप्राण्यांना त्यांच्या आधिवासात ( व्याघ्र प्रकप्ल व आभयारण्यात ) पुरेसे अन्नच उपलब्ध नसल्यामुळे ते लोकवस्तीत अतिक्रमण करू लागलेत असा प्रश्न निर्माण होत असून, सुस्तीत बसलेल्या वनविभागाला खऱ्या आत्मचिंतननाची गरज निर्माण झाली आहे.
सातारा जिल्हयात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्हागतर प्रकल्प असे दोन प्रकल्प सातारा, जावली, पाटण, महाबळेश्वर या चार तालुक्यांच्या हद्दीत कोयना जलाशयाच्या परिसरातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीनीवर शासनाने डल्ला मारून हजारो हेक्टर क्षेत्रावर उभे केले आहेत. मात्र अभयारण्य व कोअर क्षेत्रात माणसांने प्रवेश केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जाते. मात्र या क्षेत्रातील वन्यप्राण्यांनी प्रकल्पालगतच्या शेकडो गावांमध्ये अतिक्रमण केले असून शेती नेस्तानाभूत करत शेतकऱ्यांवर हल्ले केले असल्याने भिती पोटी अनेक गावातील शेती पडीक होऊन गावं माणसांविना ओस पडू लागली आहेत.
अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पालगतच्या गाव परिसरात गेल्या पंधरा ते वीस वर्षात मोठ्या प्रमाणात लागवडीच्या वृक्षांपेक्षा नैसर्गीक जंगलाची वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी कोयना नदीच्या पलिकडे घनदाट जंगलात कोठेतरी पहायला मिळणारे रानगवे आलिकडे डांबरी रोडवर डोंगरी भागात गावागावात कळपाने पहायला मिळत असून, त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अभयारण्यातील जंगलात त्यांच्या सह अन्य वन्यप्राण्यांना चरण्यासाठी वाढलेल्या जंगलामुळे गवताच्या कुरणांचे प्रमाण कमी झाल्यानेच ते गावांतील शेतीत घुसू लागले आहेत. त्यातच माकड, बिबटया, अस्वल मोर डुक्कर आदींचाही उपद्रव वाढल्याने प्रकल्पालगतचा शेतकरी चिंतातूर झाला आहे.









