रस्ते महामंडळांच्या कामाची पुन्हा एकदा अब्रू वेशीला : विरमडे ते उडतारे दरम्यानचा प्रकार : सेवा रस्त्याचा वापर सध्या बंद
प्रतिनिधी / सातारा
रस्ते महामंडळ प्राधिकरणाने केलेल्या पाच सहा वर्षांपूर्वी पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय खराब दर्जाचे झाले आहे. कुठे ब्रिज गळतो तर कुठे खड्डेच पडलेत, सेवा रस्ता तर बोलायची सोय नाही.मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसात विरमाडे ते उडतारे यादरम्यानचा सेवा रस्ता खचला आहे.या सेवा रस्त्यावरची वाहतूक सध्या बंद आहे.परंतु सेवा रस्त्याचे केलेले काम ही किती दर्जेदार ठेकेदाराने केले याचा अंदाज येतो.या कामाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्ग होताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत.हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.रस्त्याचे काम होऊन काही वर्षेच उलटली आहेत.अजूनही हे काम अजून ही काही ठिकाणी सूरु आहे.हे काम होताना सिमेंटचा रस्ता असेल वा डांबरचा दोन्हीही लेन आणि दोन्ही लेनच्या बाजूचे सेवा रस्ते व बांधण्यात आलेले ब्रिज कुठे ना कुठे सातत्याने काम काढत आहेत. आणि महामार्गाची अब्रू पुन्हा पुन्हा उजेडात येते.सध्या जिह्यातील जाणाया 125 किलोमीटर अंतरात खड्डेच खड्डे आहेत.त्यातच भर पडली ती सेवा रस्ता खचण्याची.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसात वापराविना पडून असलेला सेवा रस्ता अचानक दीड ते दोन फूट इतका खचला आहे.स्थानिक नागरिकांनी या खचलेल्या रस्त्याची माहिती आनेवाडी टोल व्यवस्थापनाला दिल्याचे समजते.मात्र, अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नाही.हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे.महामार्गावर सातारा शहरापासून ते वेळे बोगद्यापर्यत सेवा रस्ता आहे.सेवा रस्ता खचल्याने केलेल्या कामाची प्रचिती येत आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा
जनतेच्या पैशातून हा रस्ता केला आहे.दररोज टोल घेतला जात आहे.टोलचा झोल सुरू असताना काम चांगले करायचे सोडले आणि नागरिकांचे जीव घेणारे काम होत आहे.त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्याच्याकडून दंडासह दिलेला निधी वसूल करावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी केली आहे.









