प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांर्गत महापालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांना ओळखपत्र तसेच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यत जवळपास १३९८ पथ विक्रेत्यांनी ओळ्खपत्रासाठी अर्ज नेले आहेत. त्यापैकी ६११ पथविक्रेत्यांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. तर केवळ १८० पथ विक्रेत्यांना आतापर्यंत ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबाजवणी करण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आता मनपा क्षेत्रात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याला आपले फेरीवाला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मनपाकडून दिले जाणार आहे. यासाठी गुरुवारपासून अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या फेरीवाल्यांनी मनपाकडून अर्ज नेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज कागदपत्रांसह मनपाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या कार्यालयात जमा करावेत असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.








