ऑनलाईन टीम / काबुल :
सरकारी मीडिया संचालकांच्या हत्येनंतर अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानविरोधात कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत अफगाण सैन्याने 385 तालिबान्यांचा खात्मा केला. तर या कारवाईत 210 तालिबानी जखमी झाले आहेत.
अफगाण संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानच्या लष्कराने नानगढहार, लोगार, गजनी, पक्टिका, कंधार, मैदानवरदक, हेरात, फराह, समनगन, ताखर, हेलमंद, बगलाण आणि कापिसा प्रांतातील तालिबान्यांवर ही कारवाई केली आहे. हेलमंद प्रांतात लष्करगाह शहरात तालिबानच्या लक्ष्यांवर हवाई हल्ल्यात 112 दहशतवादी ठार झाले. त्यामधील 30 जण पाकिस्तानी अल-कायदाचे सदस्य होते.
सप्टेंबरमध्ये विदेशी सैनिकांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबान संघटनेने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकी सैन्य परल्यानंतर तालिबान आणि अफगाण सैन्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. तालिबानी जवळपास अफगाणिस्तानातील अर्धा भाग काबीज केला आहे. शनिवारी अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी असलेले शेबर्गन शहरही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यानच्या हिंसाचारात 1659 नागरिक ठार झाले आहेत. तर 3254 जखमी झाले आहेत.









