पंतप्रधान मोदींचे जी-20 च्या ‘अफगाणिस्तान विशेष’ परिषदेत प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील परिस्थितीला संपूर्ण विश्व समुदायाने संघटितरित्या प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत या देशाला दहशतवाद आणि कट्टर धर्मांधतेचे केंद्र बनू देता कामा नये. विश्व समुदायाने एकत्रितरित्या अफगाणिस्तानसंबंधीचे धोरण निर्धारित केले नाही, तर तेथील परिस्थिती हाताबाहेर जाऊन साऱया जगासमोर मोठा धोका उभा राहील, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 च्या ‘अफगाणिस्तान विशेष’ परिषदेत केले.
त्यांनी या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. सध्या जी-20 परिषदेची अध्यक्षता इटलीकडे आहे. इटलीने पुढाकार घेऊन या महत्वाच्या अपगाणिस्तान संबंधीच्या परिषदेचे आयोजन केले यासाठी त्यांनी इटलीचे कौतुक केले. धार्मिक कट्टरतावाद, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापार यांच्या अभद्र युतीशी जगाला संघटितरित्या लढा द्यावा लागणार आहे. तसे न केल्यास साऱया जगाच संकटात पडेल असा इशारा त्यांनी दिला.
समावेशक प्रशासनाची आवश्यकता
अफगाणिस्तानात सर्व समाजघटकांना आणि विचारसरणींना सामावून घेणारे सरकार असणे आवश्यक आहे. असे सरकार असल्यासच गेल्या 20 वर्षांमध्ये तेथे झालेली प्रगती आणि परिवर्तन पुढे सुरु राहील, तसेच कट्टर धर्मांधता रोखली जाईल. अफगाणिस्तानला त्वरीत मानवीय साहाय्यता देण्याचीही आवश्यकता आहे. अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यवर्ती भूमिका साकारावी, या मताला भारताचा पाठिंबा आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघात अफगाणिस्तानसंबंधी संमत केलेल्या प्रस्ताव क्रमांक 2,593 चे क्रियान्वयन पूर्णांशाने होण्याची आवश्यकता आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सहस्रावधी वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये भारताने त्या देशाच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी मोठा हातभार लावला आहे. त्या देशातील महिला आणि युवावर्ग यांना सक्षम बनविण्यासाठी भारताने प्रयत्न केले आहेत, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले.









