ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रक्रिया सुरू करण्यासाठी 400 तालिबानी कैद्यांची सुटका करण्यास अफगाण परिषदेने मंजूरी दिली आहे. तालिबानी अतिरेक्यांची सुटका झाल्यास अफगाणिस्तानातील दोन दशकांचे यादवी युद्ध संपवण्याच्या उद्देशाने शांतता चर्चा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
यापूर्वी अफगाण सरकारने अंदाजे पाच हजार तालिबानी कैद्यांची सुटका केली आहे. परिणामी, तालिबानने 1100 सरकारी दले, सरकारी कर्मचारी आणि राजकीय पक्षांच्या लोकांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले आहे. या 400 तालिबानींची सुटका झाल्यावर आता अफगाण सरकार आणि तालिबानींमधील चर्चेला प्रारंभ होऊ शकणार आहे.
तालिबानी कैद्यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी आणि शस्त्रबंदी लागू करून शांतता चर्चेला प्रारंभ करण्यात यावा, असे अफगाण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे. अफगाणिस्तानची अधिकृत भाषा असलेल्या पश्तो आणि फारसी भाषेत जारी करण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, लोया जिर्गाने देशात शांतता प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि रक्तपात संपवण्यासाठी 400 तालिबानची सुटका करण्यास मंजुरी दिली.
अमेरिका आणि तालिबानमध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या करारानुसार अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये चर्चेला सुरुवात होणे गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.









