शियाबहुल भागात हल्ला : मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश
वृत्तसंस्था / हेरात
अफगाणिस्तानच्या हेरात शहरात एका मिनी व्हॅनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे. हल्ल्यात 10 जण जखमी झाले असून स्फोटामागील उद्देश अद्याप समजला नसल्याचे तालिबान कमांडर मावलवी अंसारीने सांगितले. तर कुठल्याही संघटनेने अद्याप हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
प्रारंभिक तपासानुसार प्रवासी वाहनाच्या ऑईल टँकवर स्फोटके ठेवण्यात आली होती असे तालिबानच्या गुप्तचर विभागाचे प्रवक्ते सबित हार्वी यांनी सांगितले आहे. 10 जखमींपैकी 3 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
शिया समुदायाचे प्रमाण अधिक असलेल्या हेरातमधील भागात हा स्फोट घडवून आणला गेला आहे. हा समुदाय आयएसआयएस आणि इस्लामिक स्टेट इन खुरासानच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत असतो. याचमुळे या हल्ल्यामागे याच संघटनांचा हात असू शकतो अर्से अनुमान व्यक्त होत आहे. हेरात हे अफगाणिस्तानातील तिसऱया क्रमांकाचे शहर असून ते इराणच्या सीमेनजीक आहे.









