तालिबानकडून घोषणा
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात ‘तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत’ (तापी) गॅस पाइपलाइन प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहे. तालिबानचे काळजीवाहू विदेशमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी तुर्कमेनिस्तानचे विदेशमंत्री राशिद मेरेदोव्ह यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
तुर्कमेनिस्तानचे शिष्टमंडळ आणि तालिबान यांच्यात तापी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासह अन्य आर्थिक आणि राजकीय मुद्दय़ांवर सहमती झाली आहे. तापी समवेत रस्तेनिर्मिती आणि विजेच्या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याचे मुत्ताकी यांनी सांगितले आहे.

भारतासाठी महत्त्वपूर्ण तापी प्रकल्पाची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 10 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे अफगाणिस्तनाला दरवर्षी मोठा महसूल मिळणार आहे. 1800 किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचा 816 किलोमीटरचा हिस्सा अफगाणिस्तानात आहे.
तापी पाईपलाइनमधून दरवर्षी 33 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायू वाहून नेण्यात येणार आहे. ही पाईपलाईन जगातील दुसरे सर्वात मोठे वायू क्षेत्र गल्किनेश येथून 1,800 किलोमीटर (1,125 मैल) पर्यंतच्या मार्गासोबत पाकिस्तान सीमेनजीकच्या भारतातील शहरापर्यंत असणार आहे. अफगाणिस्तानात प्रकल्पावर फेब्रुवारी 2018 मध्ये काम सुरू झाले होते. यात 1,814 किलोमीटर लांबीची गॅस पाइपलाइन सामील असेल, ज्याचा उद्देश नैसर्गिक वायू अफगाणिस्तानातून पाकिस्तान आणि भारतात आणणे आहे. यातील किमान 816 किलोमीटर लांबीची पाइपलाइन अफगाणिस्तानातून जाणार आहे. पण मागील काही वर्षांमध्ये अन्य मुद्दय़ांसोबतच असुरक्षिततेमुळे अफगाणिस्तानात याच्या कार्याला विलंब झाला आहे.









