नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात गेले आहे. यात राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या भीषण परिस्थितीमुळे अफगाणिस्तामधील नागरिक कसलाही विचार न करता देश सोडून पळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहयला मिळतयं. यामुळे काबुल विमान तळावर मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय नागरिकही काबुल विमानतळावर अडकून पडले आहेत. या भारतीयांना लवकरंच देशात आणले जाईल अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष देऊन आहोत. यात भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांची चिंता समजून घ्यावी लागेल, परंतु अशा परिस्थितीत एअरपोर्ट ऑपरेशन सर्वात मोठे आव्हान आहे. यामुळे सर्व प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप देशात आणण्यासाठी विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली आहे.
भारतीय वायूसेनेचं C-17 हे विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झालं आहे. भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्या संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. या विमानात जवळपास १४० भारतीय आहेत. यात भारतीय राजदूत आर. टंडन यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना काबूलमधून परत भारतात आणण्यात येत आहे. त्याचबरोबर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर भारतात परत आणण्यात येत आहे.