राजधानी काबूलवर तालिबानींचा कब्जा- राष्ट्राध्यक्ष गनी यांचे देशाबाहेर पलायन- सत्ता हस्तांतरासाठी वाटाघाटी
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला असून राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. या बिघडलेल्या परिस्थितीनंतर देशभर अनागोंदी माजली आहे. स्थानिक नागरिक स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. दरम्यान, सत्ता हस्तांतराबाबत तालिबानचे मध्यस्थ राजवाडय़ात वाटाघाटी करत असल्याचे वृत्त आहे. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला हे चर्चेत सहभागी झाले आहेत. लवकरच तालिबानकडून ‘इस्लामी अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ची घोषणा केली जाण्याची शक्मयता आहे.

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी आपण देश का सोडला यासंदर्भात रात्री उशिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी जवळच्या सहकाऱयांसोबत आपण देश सोडून पळून गेल्याचे रविवारी सायंकाळी जाहीर केल्यानंतर काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्याचे निश्चित झाले. पुढील काही तासांमध्ये शहरामधील जवळ-जवळ सर्वच कार्यालये आणि अध्यक्षीय प्रासादावर तालिबानने ताबा मिळवला. राजधानी काबूलच्या बाहेरील भागात प्रवेश करण्यापूर्वी तालिबानी गटाने रविवारी सकाळी जलालाबादवर कब्जा केला होता. काबूल व्यतिरिक्त जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबान पकडीतून वाचले होते. हे पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे.
संयुक्त राष्ट्राचे प्रमुख ऍन्टोनियो गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असे आवाहन केले. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे जगभरातील 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे. अमेरिकेने आपले सैन्य पाठवत दुतावासासह विविध अधिकाऱयांना मायदेशी आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
अमेरिका, ब्रिटनने पाठवले सैनिक
आपल्या दुतावासातील कर्मचारी आणि नागरिकांना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या सहा हजार सैन्याची एक तुकडी अफगाणिस्तानमध्ये गेली आहे. त्यांनी अमेरिकन दुतावास संपूर्णपणे रिकामे केले आहे. तसेच ब्रिटनने आपल्या दुतावासातील अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी 600 सैनिकांची तुकडी पाठवली. दरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसेच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.
भारताकडूनही बचावकार्य
काबूलमधील झपाटय़ाने बदलणाऱया परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. भारतानेही रविवारी आपल्या 124 नागरिकांना आणि इतर अफगाणी नागरिकांना सुखरुपपणे भारतात परत आणले. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने एअर इंडियाची दोन विमाने सज्ज ठेवली आहेत. भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबानने दिली आहे. मात्र भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकन सैन्याच्या गोळीबारात 5 ठार
आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करायला गेलेल्या अमेरिकन सैन्याने काबूल एअरपोर्टवर गोळीबार केला. या गोळीबारात किमान पाच लोक मृत्यूमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. काबूल एअरपोर्टवर आपापल्या देशात जाण्यासाठी हजारो नागरिक जमले असताना अमेरिकेच्या सैन्याने हा गोळीबार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीन-पाकिस्तानची तालिबानींशी जवळीक
चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीने औपचारिकरित्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. चीन आणि पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील नव्या सरकारसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानला दहशतवादाच्या उत्पत्तीचे ठिकाण होऊ देता कामा नये, असे म्हणत तालिबानला विरोध केला आहे.
अशरफ गनी यांचा आश्रय नक्की कोठे ?
राष्ट्रपती अशरफ गनी, उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांच्यासह सरकारी अधिकाऱयांसह तजाकिस्तानमध्ये पळून गेले होते. तथापि, त्यांचे विमान उतरण्यास अनुमती देण्यात आली नाही. त्यानंतर ते कतारमध्ये उतरल्याचे समजते. तथापि, न्यूज चॅनेल अल जझीराने गनी यांच्यासह त्यांची पत्नी, त्यांचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील देश उझबेकिस्तानमधील ताश्कंद शहरात असल्याचे म्हटले आहे. देशाबाहेर पडताना त्यांनी प्रचंड पैसा आणि संपत्ती सोबत नेल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. तालिबानने गेल्या दहा दिवसात अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर ताबा मिळवल्यामुळे अशरफ गनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता.
तालिबानी नेता ‘मुल्ला बरादर’ होणार अफगाणचा राष्ट्राध्यक्ष ?
मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्यासह अन्य काही नेत्यांनी 1994 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची चळवळ सुरू केली होती. अफगाणिस्तानात सत्ता हस्तांतरित झाल्यानंतर बरादर यांच्याकडे तालिबानची कमान सोपवली जाण्याची शक्मयता आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयात तालिबान आणि सरकारी प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरु असतानाच तालिबान्यांनी मुल्ला बरादर यांना भावी अध्यक्ष घोषित केले आहे.
‘लूटमार रोखण्यासाठी’ काबूल शहरात प्रवेश- तालिबान
काबूलमध्ये होणारी संभाव्य लूटमार रोखण्यासाठी आपण शहरात प्रवेश करत आहोत, असे म्हणत तालिबान काबूल शहरात प्रवेश करत आहे. तालिबानने आपल्या कार्यकर्त्यांना शहरात प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तालिबान संघटनेचे प्रवक्ते झबीनुल्लाह मुजाहिद यांनी दिली. नागरिकांनी तालिबानच्या बंडखोर कार्यकर्त्यांची भीती बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही, असेही तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप
अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी ट्विटरवरून थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. ‘त्यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवत मातृभूमी विकली. त्यांच्या गटाचा धिक्कार असो,’ असे ट्विट मोहम्मदी यांनी केले होते. तालिबानच्या नियंत्रणापूर्वी ‘काबूलच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलीय. काबूलच्या संरक्षणासाठी सुरक्षा दल आणि संरक्षण फौजा कटिबद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय तुकडय़ा आपल्या संरक्षण आणि सुरक्षा दलांना मदत करण्यासाठी तयार आहेत,’ असे ट्विटही केले होते.









