3 रॉकेट्स डागण्यात आली ः सर्व विमानोड्डाणे रद्द
वृत्तसंस्था / कंधार
अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर रॉकेटने हल्ला झाला आहे. विमानतळाच्या दिशेने तीन रॉकेट्स डागण्यात आली आहेत. यातील 2 रॉकेट्स धावपट्टीवर कोसळून स्फोट झाला आहे. धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम केले जात असल्याची माहिती विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून यांनी दिली आहे.
शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यांमागे तालिबानचा हात असल्याचे मानले जात आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात, लष्कर गाह आणि कंधारला चहुबाजूने घेरले आहे. सध्या कंधारमध्ये दहशतवाद्यांचा अफगाण सुरक्षादलांसोबत संघर्ष सुरू आहे.

कंधार हे अफगाणिस्तानातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. येथील विमानतळाचा वापर अफगाणिस्तानच्या सैन्याला शस्त्रास्त्रs आणि रसद पुरविण्याकरता केला जातो. याचमुळे तालिबान या विमानतळावर कब्जा करून अफगाण सैन्याची रसद रोखू पाहत आहे. मागील 2-3 आठवडय़ांमध्ये तालिबानने या भागामधील हल्ले वाढविले आहेत.
अफगाणिस्तान नॅशनल डिफेन्स सिक्युरिटी फोर्सेसने अमेरिकेच्या मदतीने तालिबानच्या कब्जातील अनेक गावे मुक्त करविली आहेत. या कारवाईनंतर तालिबानच्या हिंसाचारात पाकिस्तानी सैन्यही सामील झाल्याचे समोर आले आहे. चकमकीदरम्यान पाकिस्तानी सैन्याचे अनेक अधिकारी मारले गेले आहेत. त्यांच्या मृतदेहाजवळून पाकिस्तानी ओळखपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
कंधारमधील सद्यस्थिती
कंधार भागात तालिबानी दहशतवादी शिरले असून सुरक्षा दलांसोबत त्यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. युद्धामुळे आतापर्यंत कंधारमधून हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या लोकांनी पाकिस्तान आणि इराण या देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
पाकिस्तानचा डाव
अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या प्रभावाचा लाभ उचलण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविला आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्द यासारख्या दहशतवादी संघटना भारताला लक्ष्य करण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करू पाहत आहेत. प्रेंच न्यूज लेटर एशियालिस्टच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.









