पाकिस्तानमार्गे पाठविला 50 हजार मेट्रिक टन गहू
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महागाई, गरीबी आणि खाद्य संकटाला तोंड देणाऱया अफगाणिस्तानच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. भारताने मंगळवारी पाकिस्तानच्या मार्गे अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गहू पाठविला आहे. धान्याची ही खेप विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. भारताच्या या पुढाकारामुळे अफगाणिस्तानचे नागरिक अत्यंत आनंदी आहेत.
गव्हाची ही खेप पाकिस्तानसोबत झालेल्या चर्चेच्या आधारावर अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात पोहोचणार आहे. यासंबंधी भारताने 7 ऑक्टोबर रोजी 50 हजार टन मेट्रिक टन गहू पाठविण्यासाठी ट्रान्झिट सुविधेची विनंती करणारा प्रस्ताव पाकिस्तानला दिला होता. तर 24 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर दोन्ही देशानी परिवहन संबंधी योजना निश्चित केली.
काही दिवसांपूर्वी भारताने अफगाणिस्तानला सुमारे 2.5 टन वजनाची वैद्यकीय सामग्री आणि कपडे पाठविले होते. मागील आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील शीख-हिंदूधर्मीयांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.